भारतातील वैद्यकीय ज्ञान प्रगत झाले असे आपण म्हणतो; पण आजही ऑटिझम सारखे कित्येक आजार सर्वसामान्यांना माहीत नसल्याने या आजाराचे असंख्य रुग्णांचे निदान होतच नाही. दर 10 हजारांतून 20 जणांना हा आजार असल्याचे दिसून येते. डॉ. अमोल अन्नदाते ऑटिझम म्हणजे नेमके काय? ऑटिझम या आयुष्यभर चालत राहील असा मेंदूच्या विकासाशी निगडित आजार आहे. यात प्रामुख्याने मुलां-मुलींच्या सामाजिक वर्तन, शाब्दिक व इतर सांकेतिक संवादात दोष आढळून येतो. त्यांच्या वर्तणुकीत तोचतोपणा व इतरांना वेगळेपणा आढळून येतो. वातावरणातील इतर बदल त्यांना सहन होत नाहीत. या सर्व दोषांचे प्रतिबिंब त्यांच्या सामाजिक जीवनावर उमटते. आजूबाजूचे लोक, वस्तू व वातावरणाला त्यांचा रिस्पॉन्स इतर मुलांसारखा राहत नाही.
ऑटिस्टिक मूल नेमके कसे असते? ऑटिस्टिक मुलांचा बुद्ध्यांक नॉर्मल व काही वेळा मतिमंदत्वाकडे झुकणारा असू शकतो. हे मूल इतर मुलांमध्ये न खेळणारे स्वत:च हरवलेले असते. त्यांच्या क्रियामध्ये तोचतोपणा असतो. एकच क्रिया ते वारंवार करत राहतात. खेळताना त्यांना इतर मुले खेळतात त्या खेळण्या आवडत नाहीत. ज्या वस्तूंचा खेळण्या म्हणून उपयोग होऊ शकत नाही, अशा गोष्टींशी ते खेळतात. बोलतानाही त्यांची भाषा विशिष्ट प्रकारची असते. तुम्ही बोललेले एखादे वाक्यच पुन्हा लगेच बोलून दाखवते, शब्द उलटे करणे, निरर्थक यमक जुळवत राहणे, एकच वाक्य वारंवार म्हणणे, बोलण्यात विशिष्ट लय असणे, अशा भाषेवरूनच ही मुले लगेच ओळखता येतात. गाणे, कविता ते उत्तम म्हणू शकतात; पण ज्या गोष्टीसाठी सामाजिक वर्तणुकीचे नियम पाळावे लागतात, अशा गोष्टी ते करू शकत नाहीत. तीन वर्षांपर्यंत या आजाराचे निदान पालक स्वत: करू शकत नाहीत. त्यासाठी घरच्या घरी निदान करता यावे म्हणून लक्षणांची पुढील सूची साहाय्यभूत ठरेल. परदेशात चित्रपट, डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून ऑटिझमविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे कार्य सुरू आहे; पण भारतात मात्र या आजाराची मुले अजून दुर्लक्षित आहेत. त्यांचे निदान लवकर व्हावे म्हणून या आजाराविषयी साक्षरता भारतात आवश्यक आहे.18 महिन्यांचे बाळ ऑटिस्टिक असल्यास -ते इतरांकडे बघून हसणार नाही. किंवा उशिरा हसेल. आई-वडिलांशी विशिष्ट अटॅचमेंट, स्नेह दर्शवणार नाही. इतर लोकांशी डोळ्यांचा संपर्क (आय कॉन्टॅक्ट) टाळेल. कडेवर घ्या, असा हट्ट करणार नाही.एकटे राहणे पसंत करेल. वारंवार हाताची टाळी वाजवत राहणे किंवा इतर क्रियांमध्ये वारंवारता दिसेल. खेळण्याच्या विशिष्ट भागाशींच खेळेल. वातावरणात बदल सहन करणार नाही. सांकेतिक संवाद साधता येणार नाही, उदा. एखादी गोष्ट हवी म्हणून बोट दाखवणे, टाटा करणे जमणार नाही. बाळांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केल्यास त्याला ते प्रतिसाद देणार नाही. दीड ते चार वर्षांपर्यंतचे मूल : एकटे राहील; समवयस्कांशी खेळणार नाही ,इतर लोक आजूबाजूला नसल्यासारखेच वागेल,उशिरा बोलू लागेल,
टायलेट-ट्रेनिंग अवघड जाईल ,विशिष्ट गोष्टींची भीती मनात असेल ,आधी सांगितलेल्या विशिष्ट भाषेचा वापर करेल. लागले, पडले, आजारी असले तरी सहानुभूतीची अपेक्षा कोणाकडूनही कधीही करणार नाही. ऑटिझमचे उपचार : ऑटिझम पूर्णपणे बरे करणारे असे औषध अजून अस्तित्वातच नाही; पण रिसपेरिडोस, ओलेंझेपिन, नालट्राक्झोनसारख्या औषधांनी त्यांचे वागणे, थोडेफार नियंत्रित करता येते. औषधांपेक्षा त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो. पालक, सायकॉलिजिस्ट व शाळेच्या मदतीने दिली जाणारी बिहेविअर थेरपी व त्यांचे संवाद, भाषा, सामाजिक वर्तणूक सुधारण्यासाठी दिली जाणारी ट्रेनिंग हे उपचार वयाच्या तीन वर्षांअगोदर सुरू झाल्यास त्याचा खूप मोठा उपयोग होतो. पण 5 ते 7 वर्षांपर्यंत बहुतांश मुलांमध्ये काही स्किल्स चांगल्या विकसित असतात. त्यांना चालना देऊन या मुलांसाठी शाळांमध्ये शिकवण्याच्या वेगळ्या पद्धती वापराव्या लागतात.