Friday, 23 September 2011

प्रेम कर भिल्लासारखं “


प्रेम कर भिल्लासारखं

 

मला काही भावलेले जे आवडले ते देत आहे.

नारायण सुर्वे यांच्या समग्र कविता...................

मी जन्मलो तेव्हा काही नाम धारण करून जन्मलो नाही. मात्र मी नसेन तेव्हा या पृथ्वीच्या पाठीवर एक नाव ठेवून जाईन..’ असे नारायण सुर्वे यांनी एके ठिकाणी म्हटले आहे. आज मराठी काव्यक्षेत्रातील सुर्वे यांच्या कामगिरीकडे पाहता आपल्या कवितेद्वारे सुव्र्यानी आपले शब्द सार्थ केले आहेत. ‘सुर्वे-नारायण सुर्वे यांच्या समग्र कविता’ या ‘श्रेयस’ मालिकेतील आवृत्तीचे प्रकाशन नारायण सुर्वे यांच्या प्रथम स्मृतिदिनी १६ ऑगस्ट रोजी होत आहे. त्यानिमित्ताने प्रा. दिगंबर पाध्ये यांच्या प्रस्तावनेतील संपादित अंश..
आधुनिक कवितेच्या इतिहासात केशवसुत आणि मर्ढेकर ही दोन महत्त्वाची वळणे मानली जातात. या दोन्ही कवींच्या निमित्ताने मराठी कविता अंतर्बाह्य़ बदलली. केशवसुतांनी मराठी कवितेला आत्मनिष्ठ केले, लौकिक जीवनातील भावभावनांना सामोरे केले. एकोणिसाव्या शतकात समाजाला हळूहळू परिचित होणाऱ्या आधुनिक युगाशी त्यांच्या कवितेचा संबंध होता. त्यांच्या कवितांमागे उदारमतवादी विचारसरणीतील व्यक्तिस्वातंत्र्य, समता यांसारखी मूल्ये होती. पुढे मर्ढेकरांचा उदय होऊपर्यंत मराठी कविता प्रामुख्याने याच वळणाने जात होती. या प्रवासात भावभावनांची विविधता आली, रचनाप्रकार निर्माण झाले, आधुनिक कवितेला समाजाच्या एका स्तरात प्रतिष्ठा प्राप्त झाली. एका बाजूने हे होत असतानाच काव्यविषयक कल्पना स्थिर होत गेली. कवितेची भाषा, कवितेची रचना यासंबंधीचे अनेक संकेत निर्माण झाले.
आधुनिकतेच्या समाजातील प्रवेशाने जगणे गुंतागुंतीचे होत चालले होते. समाजाचे स्वरूप बदलत होते; परंतु या बदलत्या वास्तवाला प्रतिसाद देण्याइतका जिवंतपणा या कवितेत राहिला नव्हता. कवितेला जणू जडत्वच आले होते. मराठी कवितेला आलेल्या अशा जडत्वाच्या काळात मर्ढेकर यांनी आपली नवी कविता लिहून मराठी कवितेला या जडत्वातून, संकेतांतून मुक्त केले. मर्ढेकरांची ही कविता (काही कविता, १९४७, आणखी काही कविता, १९५१) म्हणजे नव्या जाणिवेची, नव्या युगाचे भान आलेल्या मनाची कविता होती. ही कविता आधुनिकच होती; परंतु आधुनिकतेतील नकारात्मकतेचे तिला भान होते. सुर्वे यांनी या दोन्ही कवींचे त्यांना जाणवलेले वैशिष्टय़ ‘कृष्णाजी केशव दामले’ व ‘मर्ढेकरांशी बातचीत’ या कवितांतून सांगितले आहे. केशवसुतांचे ‘उललेले, फाटलेले हृदय’ सुर्वे यांना महत्त्वाचे वाटले, तर ‘अरे यांच्यासाठी काही तरी करा रे’ हा मर्ढेकरांच्या कवितेतील माणसाविषयीचा आक्रोश त्यांना महत्त्वाचा वाटला आहे. सुर्वे यांचे हे शब्द बदलून म्हणायचे तर या दोन्ही कवींच्या कवितेत भोवतालच्या वास्तवाचे, माणसांच्या जगण्याचे जिवंत भान होते. केशवसुत आणि मर्ढेकर ही दोन्ही मने भोवतालच्या वास्तवाकडे पाहणारी आणि त्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करणारी सर्जनशील मने होती. त्यांच्या प्रतिक्रियांच्या वैशिष्टय़पूर्णतेतच त्यांच्या काव्याचे नवेपण होते. मराठी कवितेने घेतलेल्या दोन्ही वळणांतील हे एक साम्य आहे, तर या दोन्ही वळणांना क्रमाक्रमाने आलेले जडत्व हे या वळणांमधील दुसरे साम्य आहे. काव्याचे नवेपण जणू विषयांच्या विविधतेत व रचनाप्रकारांच्या प्रयोगात आहे, या समजुतीमुळे केशवसुतांच्या वळणाला जडत्व येत गेले, तर काव्याचे नवेपण हे केवळ प्रतिमासृष्टी, दुबरेधता व तिरकस अभिव्यक्ती यांमध्येच सामावले आहे, या कल्पनेमुळे मर्ढेकरांच्या नव्या वळणालाही एक प्रकारचे साचलेपण आले. मराठी कवितेच्या या साचलेपणाविषयीच्या तक्रारी १९६५ नंतर मान्यवर समीक्षकांच्या लेखनात नोंदविलेल्या दिसतात. वा. ल. कुळकर्णी यांनी शेहेचाळिसाव्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून केलेल्या भाषणातील काही प्रतिक्रिया बोलक्या आहेत. वा. ल. कुळकर्णी हे साहित्यातील नव्या प्रवृत्तींविषयी स्वागतशील होते; परंतु त्यांनीही नव्या वळणाच्या या काळात कविता ‘खऱ्या अर्थाने कविता होण्याची धडपड करू लागली,’ अशा शब्दांत या कवितेचे कौतुक केले असले तरी, ‘परंतु अशा कवितेची ‘भाषा’ आज कित्येक वेळा इतकी ‘खासगी’ बनते आहे, इतकी केवळ तिची बनते आहे व ती ज्या जगाची भाषा असावी ते जग टीकाकाराला इतके अपरिचित वाटते आहे की, तो अनेकदा (प्रामाणिक असल्यास) हतबल होतो आहे, भांबावून जातो आहे व मूक बनतो आहे,’ अशी तक्रार करून मराठी कवितेच्या साचलेपणाचीच अप्रत्यक्ष जाणीव करून दिली आहे. पुढे दोन वर्षांनी १९४५ ते १९६५ या काळातील मराठी कवितेचा आढावा घेताना रा. श्री. जोग यांनीही काव्याच्या दुबरेधतेचा उल्लेख केला आहे.मर्ढेकरांच्या वळणावर लिहिल्या जाणाऱ्या मराठी कवितेबद्दलच्या अशा काही प्रतिक्रिया पाहिल्या की, १९६०-६५ च्या सुमारास मराठी कवितेला आलेल्या साचलेपणाचे स्वरूप लक्षात येण्यासारखे आहे. मराठी कवितेला आलेल्या या स्वरूपामुळे ती वाचकांपासून- रसिकांपासून दूर जाऊ लागली होती. कविता समजणे, तिचा आनंद घेणे ही एक खास बाब आहे, काव्यरूप पावणारे असे काही खास अनुभव आहेत अशा समजुती चुकीच्या पद्धतीने स्थिरावत होत्या. तसे संकेत निर्माण होत होते आणि या संकेतांमुळेच स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी कवितेला एक प्रकारचे जडत्व येत होते.
या पाश्र्वभूमीवर नारायण सुर्वे यांची कविता लिहिली गेली आहे. हे लक्षात घेतले म्हणजे या कवितेचे वेगळेपण चटकन डोळ्यांत भरते. त्या काळातील सर्व रूढ संकेतांपासून ती मुक्त आहे. तिला तरतरीतपणा, हुशारी दाखविण्याची महत्त्वाकांक्षा आहे असे दिसत नाही. प्रतिमांमध्ये हरवून जाण्याचा तिचा स्वभाव नाही. सुर्वे यांच्या कवितेच्या साधेपणाचे एक महत्त्व ती ज्या संदर्भात लिहिली गेली त्या संदर्भात आहे. सुर्वे यांच्या या कवितेमुळे मराठी कविता पुन्हा एकदा वास्तव जीवनाकडे वळली; सामान्य माणसांच्या सुखदु:खांकडे वळली हे या कवितेचे श्रेय आहे. मराठी कवितेतील अनुभवांविषयीचे संकेत या कवितेने पुन्हा एकदा मोडून टाकले. कष्टकऱ्यांच्या जीवनातील भावना, त्यांची स्वप्ने, त्यांच्या जीवनातील काव्य या कवितेने व्यक्त केले. अनेक दाहक वास्तव अनुभव सुर्वे यांच्या कवितेमुळे काव्यरूप पावले. सूक्ष्म व तरल अनुभवच काव्यरूप घेऊ शकतो अशी समजूत रूढ असताना सुर्वे यांनी आपल्या कवितेतून दणकट अनुभवविशेष साकार केले.
वैफल्याशिवाय कवितेला खरी कलात्मकताच प्राप्त होत नाही अशी समजूत रूढ होण्याच्याच काळात आशावादी कविता लिहून आपले वेगळेपण सुर्वे यांच्या कवितेने वाचकांच्या मनावर ठसविले. कवितेच्या भाषेचा जो तोच तो किरटेपणा मराठी कवितेत जाणवू लागला होता त्याला सुर्वे यांच्या कवितेने एक धक्का दिला. सुर्वे यांच्या या अशा कवितेमुळे मराठी कविता पुन्हा एकदा मोकळी झाली. संकेतांनी जखडल्या जाणाऱ्या मराठी कवितेला असे मुक्त करणे हे मराठी कवितेच्या संदर्भातील सुर्वे यांचे श्रेय आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षणाच्या संधींचा विस्तार होऊन १९६० च्या सुमारास नवी शिक्षित पिढी साहित्य व्यवसायात प्रवेश करण्याच्या सुमारालाच सुर्वे यांची कविता आपली ठसठशीत वैशिष्टय़े घेऊन वाचकांसमोर आली. भोवतालच्या वास्तवाला भिडण्याची या कवितेची प्रवृत्ती होती. एका बाजूने ज्ञान व संपत्ती यांची समाजात वाढ होत असतानाच अज्ञान व दैन्य यांचीही होणारी निर्मिती ही आधुनिकतेचीच नकारात्मक बाजू समाजासमोर येत होती. या नकारात्मक बाजूच्याच ठायी असणारे सामथ्र्य पाहण्याची, त्याच्या आधारे भविष्याचे स्वप्न पाहण्याची प्रवृत्ती या कवितेतून जाणवण्यासारखी होती. एक वेगळे भाव या कवितेत होते. साहजिकच वेगवेगळ्या स्तरांतून येणाऱ्या नव्या कवींना ही कविता आपलीशी वाटली. परिणामी सुर्वे यांच्या कवितेसारखा एक प्रवाहच मराठी काव्यक्षेत्रात आकाराला आला. आज सामाजिक जाणिवेची जी विपुल कविता लिहिली जात आहे त्या कवितेवर सुर्वे यांचा किती आणि कसा संस्कार आहे ते पाहण्यासारखे आहे. हा संस्कार केवळ साठनंतर आलेल्या नव्या कवींवरच आहे असे नाही. सुर्वे कविता लिहू लागले तेव्हा प्रथितयश असणाऱ्या कवींवरही हा संस्कार दाखविता येण्यासारखा आहे. उपेक्षित जगाला आपल्या कवितेच्या अनुभवात स्थान देण्यापासून संथ गद्य लय असणारी भाषा योजण्यापर्यंत हा संस्कार आहे. हे संस्कार म्हणजे मराठी कवितेच्या क्षेत्रावर सुर्वे यांच्या कवितेच्या पडलेल्या प्रभावाचे दर्शक आहे. भोवतालच्या बदललेल्या वास्तवाचाही हा परिणाम आहे, असे म्हटले तरी स्वातंत्र्योत्तर काळातील बदलत्या वास्तवाला अनुरूप अशी प्रवृत्ती प्रचलित करण्याचे श्रेय सुर्वे यांच्या कवितेलाच द्यावे लागते.
केशवसुत आणि मर्ढेकर या दोन्ही कवींनी मराठी कवितेला दिलेल्या वळणांच्या मुळाशी पाश्चात्त्य कवितेचा आघात होता. या दोन्ही वळणांचे प्रवर्तक इंग्रजी भाषा जाणणारे, त्या साहित्याच्या संस्कारांनी प्रभावित झालेले होते. साहजिकच पाश्चात्त्य साहित्यातील प्रवृत्तींचे मराठी काव्यपरंपरेशी नाते जोडण्याचा ‘अर्थपूर्ण’ प्रयत्न या दोन्ही वळणांत झाला. ही दोन्ही वळणे म्हणजे पाश्चात्त्य कवितेचे अनुकरण होते किंवा त्यातील वृत्ती या बाहेरून आयात केलेल्या वृत्ती होत्या असा याचा अर्थ नाही; परंतु पाश्चात्त्य साहित्याचा प्रभाव या दोन्ही वळणांतून जाणवल्यासारखा होता. याउलट पाश्चात्त्य जगातील एकही भाषा मला येत नाही. पुस्तकांच्या दुकानाजवळून वळलो की, आतील ग्रंथांवरची सुरेख कव्हरे बघतो व पुढे सरकतो. भारतीय भाषांपैकी दोन भाषा मला येतात. एक उर्दू व दुसरी हिंदी. या दोन्ही भाषांतील कविताच मी अधिक वाचतो. उर्दूची काव्यशाखा संपन्न आहे व हिंदीतील नव्या प्रवाहांची तुरळकच कविता मी वाचली आहे, असे सुर्वे यांनी स्वत:च एका लेखात म्हटले आहे. साहजिकच सुर्वे यांची कविता पाश्चात्त्य प्रभावापासून मुक्त आहे. त्यांच्या कवितेवर खोलवरचा संस्कार आहे तो उर्दू कवितेचा. सुर्वे यांच्यावर हा संस्कार कसा झाला याचे सुंदर वर्णन सतीश काळसेकर यांनी ‘अक्षर’च्या दिवाळी (२०१०) च्या अंकातील आपल्या लेखात केले आहे. तेथे ते लिहितात, ‘नारायण सुर्वे त्यांच्या पोरवयातच साम्यवादी पक्षाच्या जवळ आले. साम्यवादी पक्षाची केंद्रीय कचेरी खेतवाडीच्या नाक्यावर होती. काळ स्वातंत्र्यापूर्वीचा. पक्ष कचेरीच्या रक्षणासाठी राखणदार कॉम्रेड उभे असायचे. सुर्वे तिथे होते. पक्षाच्या कार्यकर्त्यांत उर्दू साहित्यिकांचा मोठा सहभाग होता. उर्दूला कवितेत मुशायऱ्यांची समृद्ध परंपरा होती. मोठय़ातला मोठा कवीही आपली शायरी श्रोत्यांसमोर सादर करत होता.. सुर्वेंच्या कवितेतले संवाद, गद्यात्मकतेकडे झुकणारी लय, श्रोत्यांशी थेट संवाद साधू पाहणारी सुबोध शैली हे सगळे सुर्वे यांचा अर्जित वारसा सांगणारे आहे. सुर्वे यांनी उर्दू कविता इतकी चांगल्या अंगाने आपल्या कवितेत मुरवली आहे की, त्याला प्रभाव म्हणणे निखालस चूक आहे. ते सगळे त्यांचे स्वत:चेच आहे.’ या संस्कारामुळेच सुर्वे यांनी मराठीतील रूढ रचनाबंध नाकारले. गझलसदृश रचना केली. गोष्टरूपाला महत्त्व दिले. समूहचित्रण करणारी कविता लिहिली. या सर्वामुळेच सुर्वे यांच्या कवितेला एक वेगळे व्यक्तिमत्त्व प्राप्त झाले. पाश्चात्त्य प्रभावापासून मुक्त असणारी कविता असेही एक वैशिष्टय़ या कवितेला प्राप्त झाले. स्वातंत्र्योत्तर काळात अशा साहित्याची जी एक परंपरा सिद्ध होऊ पाहात आहे त्या परंपरेतील एक महत्त्वाचे कवी म्हणून सुर्वे यांचा उल्लेख करता येतो. सुर्वे यांची कविता आशयाला प्राधान्य देणारी आहे, ती वाचकांशी सरळ संवाद करणारी आहे, ‘मी’बरोबरच ‘आम्ही’ला सामावून घेणारी आहे इत्यादी वैशिष्टय़ांचा नेहमी उल्लेख केला जातो. मर्ढेकरांच्या वळणानंतर निर्माण झालेल्या वळणाच्या संदर्भात या वैशिष्टय़ांचे वेगळेपणही जाणवते यात शंका नाही; परंतु ही वैशिष्टय़े मराठी काव्यपरंपरेलाच अपरिचित होती असे समजण्याचे कारण नाही. आशयाला प्राधान्य देणे, वाचकांशी थेट संवाद करणे किंवा त्यांना आवाहन करणे, समाजपरिवर्तनाची भाषा बोलणे इत्यादी वैशिष्टय़ांचे दर्शन केशवसुतांच्या कवितेतच घडण्यासारखे आहे. बोलण्याच्या भाषेचा वापर हे वैशिष्टय़ घेतले तरी कवितेची भाषा व बोलण्याची भाषा यातील द्वंद्व मिटविण्याचा प्रयत्न केशवसुतांच्या कवितेतही दाखविता येण्यासारखा आहे. हे विशेष खास केशवसुतांचे म्हणावेत तर तसेही नाही. ही सर्व वैशिष्टय़े थेट संतकवितेतच पाहावयास मिळण्यासारखी आहेत.
नारायण सुर्वे यांचे शब्द वापरायचे तर ‘उललेलं हृदय’ हा तसा संतकाव्याचा एक विशेषच आहे. याचा अर्थ संतांपासून सुर्वे यांच्यापर्यंतची सर्व कविता सारखीच आहे असे नाही. त्यामागील काव्यविषयक भूमिकांमध्ये खूप अंतर आहे. हे अंतर कालसापेक्ष आहे. मराठी कवितेच्या संदर्भात संतकविता ही मध्यवर्ती परंपरा आहे. मराठी कवितेला जडत्व येऊ लागले, रंजन व सांकेतिकता यामुळे तिच्यात साचलेपणा आला, की कोणत्या ना कोणत्या प्रकारे संतपरंपरेला स्पर्श करून मराठी कविता पुन्हा चैतन्य प्राप्त करून घेते. केशवसुत आणि मर्ढेकर ही मराठी कवितेची दोन्ही वळणे संतपरंपरेला कालोचित स्पर्श करूनच घेतली गेली आहेत. मर्ढेकरांच्या वळणाला जडत्व आल्यावर त्यातून मोकळे करण्याचे कार्य सुर्वे यांच्या कवितेने केले. या कवितेचेही संतपरंपरेशी नाते जुळण्यासारखे आहे. सुर्वे यांनी मराठी काव्यक्षेत्रात क्रांती केली, असे म्हणता आले नाही तरी कलात्मकतेच्या नावाखाली किरटय़ा होत चाललेल्या मराठी कवितेला पुन्हा एकदा वास्तव जीवनाच्या खुल्या मार्गावर आणण्याचे कार्य करून मराठी कवितेला एक नवे वळण देण्याचे कार्य सुर्वे यांच्या कवितेने केले आहे. सुर्वे यांच्या कवितेचे हे श्रेय वादातीत आहे.  
 

Wednesday, 21 September 2011

तुझ्या पायरीशी कुनी सान थोर न्हाई

तुझ्या पायरीशी कुनी सान थोर न्हाई
साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई
तरी देवा सर ना ह्यो भोग कश्यापाई
हरवली वाट दिशा अंधारल्या धाई
ववाळुन उधळतो जीव मायबापा
वनवा ह्यो उरी पेटला…
खेळ मांडला…. खेळ मांडला….
खेळ मांडला…. खेळ मान्ड…
सांडली गा रीत भात, घेतला वसा तुझा..
तूच वाट दाखीव गा खेळ मांडला..
दावि देवा पैल पार पाठीशी तू र्‍हा उभा
ह्यो तुझ्याच उंबर्‍यात खेळ मांडला…
उसवलं गनगोत सारं आधार कुनाचा न्हाई
भेगाळल्या भुई परी जिनं अंगार जिवाला जाळी
बळ दे झुंजायाला कीर्तीची ढाल दे
इनविती पंचप्राण. जिव्हारात ताल दे
करपलं रान देवा जळल शिवार
तरी न्हाई धीर सांडला खेळ मांडला

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी
येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी


कवी - सुरेश भट
00000000000000000

ती मला भेटायची,......

रोज सायंकाळी ती मला भेटायची,मोगर्‍याचा गजरा आणी डोळ्यात काजळ लाउन.दिवसभरचा थकवा एका क्षणात पार कुठेतरी पळायचा
आणी उरायचा तो फक्त मंद-मंद मोगर्‍याचा सुवास.रोज सायंकाळी ती मला भेटायची, गर्दीत वेगळीच उठुन दिसायची.तलम रेशमी ओढणीला तिच्या स्पर्श होताच,प्राजक्तांच्या फुलासारखी भासायची.रोज सायंकाळी ती मला भेटायची,घाई-घाई यायची आणी लवकर जाते म्हणायची.मी बळेच तिचा हात धरल्यावर,लाजुन चुर-चुर व्हायची.रोज सायंकाळी ती मला भेटायची,जरा वेळ जवळ येउन बसायची.अंधार पडायला लागला की,रानात एकट्या सापडलेल्या हरणीसारखी घाबरायची.आता सायंकाळी मी एकटाच असतो,मनातल्या आठवणींना उजाळा देत असतो.तिच्या आठवणी कधी संपतच नाहीत,लपुन राहतात मनाच्या कोपर्‍यात कुठेतरि…..

शहरात ३२ रु. खर्च करणारी व्यक्ती गरीब नाही

एखादी व्यक्ती मुंबईसारख्या मेट्रोसिटीमध्ये राहत असेल आणि दिवसाला किमान ३२ रुपये खर्च करत असेल तर ती व्यक्ती गरीब नाही. हा अजब निष्कर्ष नियोजन आयोगाने काढला आहे.योजना आयोगाचं म्हणणं आहे की,एक व्यक्ती एका दिवसात रुपया २० पैसे खर्च करुन खाण्याच्या थाळीत वरणाचा बंदोबस्त करु शकतो
रुपये ५० पैसे तांदूळ-गव्हासाठी पुरेसे आहेत रुपये ३३ पैसे दूध पिण्यासाठी फार आहेत रुपया ९५ पैसे हिरव्या भाज्यांसाठी खूप आहे रुपया ५५ पैसे खाण्याच्या तेलासाठी पुरेसे आहेत ४४ पैसे फळांसाठी पुरेसे आहेत ७० पैसे साखरेसाठी पुरेसे आहेत मीठ-मसाल्यासाठी ७८ पैसे पुरेसे आहेत रुपये ७५ पैसे गॅस सिलेंडर किंवा रॉकेलसाठी पुरेसे आहेत अभ्यासासाठी ९९ पैसे पुरेसे आहेत महिन्यामध्ये कपडे खरेदी करण्यासाठी ६१ रुपये ३० पैसे पुरेसे आहेत रुपये ६० रुपये चप्पल बुटांसाठी पुरेसे आहेत घर खरेदी करण्यासाठी किंवा घरभाडं देण्यासाठी ४९ रुपये १० पैसे महिन्यासाठी पुरेसे आहेत.

Tuesday, 20 September 2011

रवी आपल्या सहकार्याने ब्लोग् विश्वात पदार्पण केल्याबद्दल मनस्वी धन्यवाद!